औरंगाबाद : औरंगाबाद विमानतळावर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी नगरसेवक अभिजीत देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याचा ऐतिहासिक निर्णय 5 जानेवारी 2020 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे अभिजीत देशमुख यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत. देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्याची पर्यटनाची राजधानी तसेच आशिया खंडात वेगाने विकसीत होणारे शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख झाली आहे.
औरंगाबाद आज जगाच्या पाठीवर औद्योगिक केंद्र म्हणून उदयाला येत असून, या शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अजिंठा-वेरूळच्या लेण्या, बिबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ला असे पर्यटकांना आकर्षीत करणारे स्थळं या जिल्ह्यात आहेत. हे पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने औरंगाबाद विमानतळावर येतात. आपण येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिल्यामुळे आता याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवणे अत्यंत गरजेचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा वारसा उभ्या महाराष्ट्रभर चालवला. खरे तर आयुष्यामध्ये एकही लढाई न हारलेले राजे म्हणून आजही छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा जाज्वल्य इतिहास आजही प्रेरणादायी असाच आहे.
विमानतळावर त्यांचा पूर्णाकृती उभारला तर छत्रपती संभाजी महाराजांची ओळख, त्यांचे विचार, त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचेल. शिवाय त्यांचा पूर्णाकृती पुतळा सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरेल व यामाध्यमातून त्यांचे नेहमीच स्मरण होईल. तसेच औरंगाबाद शहराच्या वैभवातदेखील भर पडेल. त्यामुळे या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, असे देशमुख यांनी म्हटले आहे.